Mumbai :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं शुक्रवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवाजी पार्कवर उपस्थित होते. मनसेकडून या दीपोत्सवाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यानंतर उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं. तेव्हापासूनच मनसेचा हा दीपोत्सव चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूची विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं होणारी भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
संपूर्ण ठाकरे कुटुंब मंचावर
या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आणि पुत्र आदित्य व तेजस ठाकरे हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी, उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. फटाके आणि दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण शिवाजी पार्क परिसर उजळून निघाला होता.
हा क्षण पाहण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि हजारो मुंबईकर नागरिक उपस्थित होते. ठाकरे बंधूंना एकत्र पाहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
राजकीय भाष्याला बगल
या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती, परंतु दोन्ही नेत्यांनी कोणतेही थेट राजकीय भाष्य करणे टाळले. उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे यांनी थोडक्यात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "मराठी माणसाची एकजूट आणि तिचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल". राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात कोणतेही भाषण केले नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही सातवी भेट असल्याने, त्यांच्यातील वाढती जवळीक भविष्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे.

0 Comments