मुंबई : पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ग्रामविकास क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी "
"शी बोलताना सांगितले.
सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजना कल्पकतेने राबविणारे अधिकारी म्हणून दळवी यांनी नालौकीक संपादन केला आहे. दळवी यांनी राबविलेल्या "झिरो पेंडन्सी" या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले होते. हा उपक्रम राज्यभरात सर्व कार्यालयांमध्ये राबवावा असे आदेश मुख्य सचिव सुमीत मल्लीक यांनी महिनाभरापूर्वीच काढले आहेत. जमाबंदी आयुक्त म्हणून कार्यरत असताना दळवी यांनी सात बारा, जमिनींची मोजणी, नकाशे याबाबत अनेक नाविन्यूपर्ण निर्णय घेतले होते. सातबारा ऑनलाईन करण्याचा निर्णयही दळवी यांनीच घेतला होता. आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना संत गाडेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. ही योजनाही दळवी यांच्याच संकल्पनेतून उतरली होती.
नगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी शाळकरी मुलांची प्रगती साधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. दळवी यांनी त्यांच्या निढळ (जि. सातारा) या गावाचा पूर्ण कायापालट केला आहे. जलसंधारण, कृषी, ग्राम विकास, दुग्ध विकास, गावक-यांची आर्थिक उन्नती, शिक्षण अशी चौफेर प्रगती त्यांनी निढळमध्ये केली आहे. त्यामुळेच राज्यातील मोजक्या आदर्श गावांमध्ये निढळचाही उल्लेख होतो. निवृत्तीनंतर राज्य पातळीवर गावांच्या विकासासाठी कामे करण्यावर भर देणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
0 Comments