100 गावकऱ्यांच्या तक्रारीनंतरही रामेगावातील जय अंबिका कला केंद्रावर पोलिसांची कारवाई नाही
लातूर, दि. 8 सप्टेंबर – रामेगावातील तथाकथित जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र हे वास्तव्यात डान्सबार म्हणून सुरू असून, तीन महिने उलटूनही पोलिसांनी कसलीही कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावचे सरपंच आणि तब्बल 100 नागरिकांनी 27 मे रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. तरीही हे ठिकाण दररोज रात्री 3 वाजेपर्यंत सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांनी यापूर्वी गातेगाव पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या रोषाला आणखी खतपाणी मिळाले आहे.
अवैध धंद्यांचा अड्डा?
गावकऱ्यांच्या मते, या केंद्राच्या नावाखाली डान्सबार, सट्टा, मटका, जुगार आणि देहविक्रीसारखे अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. या व्यवसायाचा प्रमुख सूत्रधार हा डान्सबारचा सहमालक व तथाकथित "सट्टा किंग" गोपाळ पाटील असल्याचा आरोप करण्यात येतो. त्याला काही राजकीय, जातीय संघटना आणि पोलीस अधिकाऱ्यांचे उघड समर्थन मिळते, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
संस्कृतीऐवजी नंगानाच
पूर्वी लोकनाट्य केंद्रांमधून पारंपरिक वाद्य, नाट्यप्रयोग आणि स्थानिक कला सादर होत असत. मात्र आज या कलेला मागणी नसून, डान्सबार आणि देहविक्रीसारख्या उपक्रमांनी लोकनाट्यची जागा घेतली आहे, असा आरोप खऱ्या कलाकारांच्या संघटनेने देखील शासनाकडे केला आहे.
आदेश असूनही थंड कारवाई
गृह मंत्रालयाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईसाठी आदेश दिल्याचे सांगितले जात असतानाही, प्रत्यक्षात कोणतीही कृती झालेली नाही. यामुळे राजकीय व प्रशासकीय आशीर्वादामुळेच या अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप अधिक बळावला आहे.
0 Comments