Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवबा संघटनेशी संबंधित चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

 वृत्तसंस्था:- कोपर्डी खटल्याच्या सुनावणीनंतर आरोपींवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिवबा संघटनेशी संबंधित चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली तसेच प्रत्येकी 19 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावली.
अमोल सुखदेव खुणे (वय 25, रुईधानोरा, गेवराई, बीड), बाबूराव वामन वाळेकर (वय 30, अंकुशनगर, ता. अंबड, जिल्हा जालना), गणेश परमेश्‍वर खुणे (वय 28, रा. रुईधानोरा), राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (वय 21, रा.परांडा, अंबड, जिल्हा जालना) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.     
या खटल्यात फिर्यादी पोलीस कर्मचार्‍यासह सात जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. हल्ल्याची घटना न्यायालयातील सी.सी. टीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली होती. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. गेल्या वर्षी कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. 1 एप्रिल 2017 रोजीच्या नियमित सुनावणीनंतर आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलूमे, संतोष भवाळ या तीन आरोपींना पोलीस कर्मचारी न्यायालयातील लॉकअपमधून बाहेर काढून सबजेल कारागृहात घेऊन जात असतानाच न्यायालयाच्या आवारात चौघे जण सत्तूर घेऊन आरोपींच्या दिशेने धावून आले. पोलीस बंदोबस्त जास्त असल्याने पोलिसांनी या चौघा जणांना ताब्यात घेतले. या चार आरोपींबरोबर झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी रवींद्र भास्कर टकले हे जखमी झाले होते. सहायक फौजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चौघा आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments