Hot Posts

6/recent/ticker-posts

तिसर्‍या आघाडीच्या चाचपणीला वेग

नवी दिल्ली, दि. 27 – केंद्रातील रालोआ सरकार विरोधात संसदेत विरोधकांनी शड्डू ठोकलेला असतानाच तिसर्‍या आघाडीच्या चाचपणीला वेग आला आहे. भाजपविरोधात तिसरी आघाडी बनविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी त्या अनुषंगाने मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत, द्रमुक नेत्या कनिमोळी, टीआरएस नेत्या के. कविता, राजद नेत्या मिसा भारती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदींची भेट घेतली.
कॉंग्रेस आणि भाजप यांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यास अनेक प्रादेशिक नेते सकारात्मक आहेत. त्यात ममता यांच्यासह शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव, आंध्रचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी बनविण्याच्या मोहिमेला मागील काही दिवसांमध्ये वेग आला आहे. चार दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आज विविध नेत्यांची भेट घेत संभाव्य तिसर्‍या आघाडीची चाचपणी केली. शरद पवार यांच्या या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे हेही हजर होते.
इसोनिया गांधी, राहुल यांनाही भेटणार
इकॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बरी नाही. लवकरच आपण त्यांची भेट घेणर आहोत, असे सांगतानाच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यास आपणास काहीही वावडे नसल्याची टिप्पणीही ममता यांनी केली. नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्या भाजपवर चांगल्याच भडकल्या. भाजप हिंदुत्वास बदनाम करीत असल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या की, देशात सध्या भाजपने भयाचे वातावरण पसरवले आहे. न्यायपालिका, प्रसार माध्यमे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. देशात भाजपपेक्षा जास्त जातीयवादी पक्ष अन्य कोणताच नाही. हिंदुत्वाच्या नावावर हिंसाचार पसरवून हिंदुत्वास बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.
नोटबंदी, जीएसटी, बँक घोटाळे आदींमुळे जनता मेटाकुटीला आली असल्याचा आरोप करून ममता पुढे म्हणल्या की, भाजप विरोधात समविचारी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी तयार करणे हे आमचे ध्येय आहे. भाजपचा गाशा लवकरच गुंडाळला जाईल यासाठी आम्ही सारी ताकत पणास लावणार आहोत. विशेष म्हणजे तिसर्‍या आघाडीच्या चाचपणीसाठी अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ममतांची भेट घेतली होती. कोणत्या नेत्यांसोबत नेमकी कोणती चर्चा झाली याचा खुलासा करण्यास मात्र बॅनर्जी यांच्यासह संबंधित नेत्यांनी देखील नकार दिला. ममता बॅनर्जी उद्या बुधवारी भाजपचे नाराज नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments