Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात कृषी सेवक पदासाठी झालेल्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय

वृत्तसंस्था औरंगाबाद, – राज्यात कृषी सेवक पदासाठी झालेल्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा या कथित घोटाळ्याची झळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
फेब्रुवारी 2018 मध्ये राज्यात कृषी सेवक पदासाठी 908 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद विभागामध्ये 92 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या 92 जागांसाठी औरंगाबाद येथे विविध परीक्षा केंद्रांवर 13 व 14 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. परीक्षा संपताच काही कालावधीतच परीक्षेचा निकाल लागला होता.
या परीक्षांमध्ये अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील अर्चना गुलगे व श्रीनिवास शेवतकर या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये अर्चनाला 200 पैकी 172 गुण तर श्रीनिवास याला 200 पैकी 136 गुण मिळाल्याचे परीक्षा केंद्रावर दाखवण्यात आले होते. परंतु 7 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेची यादी प्रसिद्ध झाली, त्यावेळी परीक्षा केंद्रावर दाखविण्यात आलेल्या गुणांत व संकेतस्थळांवरील गुणामध्ये मोठी तफावत दिसुन आली. यामध्ये अर्चना गुलगे या विद्यार्थिनीला चक्क 87.76 व श्रीनिवास शेवतकर याला 85.28 इतके गुण दाखविण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी विभागीय कार्यालयात औरंगाबाद येथे चौकशी केली असता तेथील अधिकार्‍यांनी ‘आम्हाला काही माहिती नाही तुम्ही कृषी आयुक्तालय पुणे’ येथे जाऊन माहिती घ्या, असे सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी पुणे येथे जाऊन विचारणा केली असता तेथील अधिकार्‍यांनीही विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments