बारामतीच्या विकासाच्या गप्पा गल्ली ते दिल्लीपर्यंत होत असतात. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वस्त धान्य दुकानातील गोरगरीबांना मिळणारा गहू, तांदळाचा काळाबाजार होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. बहुतांश कार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानात आधारकार्ड लिंक करुन आधारकार्डची प्रत वारंवार देऊनही आधारकार्ड लिंक झाले नसल्याचे सांगत काळाबाजार केला जात आहे. बड्या व्यापाऱ्यांच्या आडतीवर स्वस्त धान्य दुकानातून विक्री करण्यात येणाऱ्या तांदूळ आणि गव्हाची पोती बारामती मार्केट यार्डमध्ये येत असल्याचा गैरप्रकार सातत्याने घडत असल्याचे बोलले जात आहे.
स्वस्त धान्यदुकानात २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदुळ मिळतो. मात्र, स्वस्त धान्य दुकानधारक हाच माल २० पट जादा दराने म्हणजेच १८ ते २० रुपये प्रति किलो गहू आणि १६ रुपये प्रति किलो तांदुळ या दराने विकला जातो. पुन्हा हाच माल लिलाव करुन आडत व्यापाऱ्यांमार्फत जादा दराने विकला जातो.
याबाबत पुरवठा निरिक्षक संजय स्वामी यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी काळ्या बाजारात रेशनिंगचा माल विकला जात असल्याचे अद्याप आमच्या निदर्शनास आली नसल्याचे म्हटले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करुन माहिती घेतली जात आहे. मात्र, तरीही असा गैरप्रकार होत असल्यास धाडी टाकून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही आश्वासन स्वामी यांनी दिले.
0 Comments