Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यातला दांडेकर पूल पाण्याखाली, मोठ्या प्रमाणात नागरिकही अडकले,बचाव कार्य सुरू


दरम्यान खडकवासला धराणातून पाणी सोडणे पाटबंधारे विभागाने बंद केले आहे. आपत्ती निवारण यंत्रणा अर्ध्या तासानंतर घटनास्थळी दाखल झाले आहे. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाचे जवान पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. कालव्याचे पाणी जवळील परिसरामध्ये पुर्णत: पसरले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दोराच्या साहाय्याने लोकांना सुरक्षितस्थळी बाहेर काढले जात आहे. तसेच या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये लाखो लिटर पाणीही वाया गेले. 

या घटनेमुळे जवळील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन महापौरांनी  केले आहे. खडकवासला धरणातून होणारा १२७० क्युसेकचा विसर्ग कालवा फुटल्याची माहिती मिळताच बंद करण्यात आला आहे. पाण्यामुळे परिसराला अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. हे पाणी जवळील आंबील ओढा वसाहतीमध्येही शिरले आहे. 

आंबील ओढा वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. गॅस सिलिंडर तसेच इतर घरगुती वापराच्या वस्तु नदी पात्रातून वाहून गेल्याचे दृष्य दिसत होते. या घटनेमुळे अलका चौक, स्वारगेट टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments