अहमदनगर : शिवसैनिकांचे हत्या ही राजकीय वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघड झाले असून केडगाव येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येचा घटनाक्रम उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानुसार मुख्य आरोपी संदीप गुंजाळ आणि संदीप गिऱ्हे या दोघांनी गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर घटनेपूर्वी आरोपींच्या वारंवार संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.
अशी झाली हत्या
शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे महाज्योत हॉटेल येथे पार्टीसाठी बसले होते. तेथे पोटनिवडणुकीतील मतदानावरून कोतकर यांनी रवी खोलम याला शिवीगाळ केली. खोलम याच्या परिसरातून शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मते पडल्याने फोनवरील संभाषणात दोघांची चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी कोतकर याने खोलम याला ‘तू घरी थांब. तुझ्याकडे येतो. तुझ्याकडे पाहतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर कोतकर व ठुबे हे दुचाकीवरून केडगावमधील सुवर्णनगर परिसरातील खोलम याच्या घराकडे निघाले.
दरम्यानच्या काळात खोलम याने फोनवरील संभाषण नगरसेवक विशाल कोतकर, औदुंबर कोतकर यांच्या कानावर घातले. त्यानंतर विशाल कोतकर याने तातडीने संदीप गुंजाळ याला फोन करून खोलम याच्या घरी पाठविले. लगेच गुंजाळ, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे व आणखी एक असे चौघे दोन दुचाकीवरून खोलमच्या घरी गेले. खोलम घरी नव्हता. त्यामुळे त्यांनी फोन करून चौकशी केली, तेव्हा तो विशाल यांच्याकडेच गेल्याचे कळाले. मात्र, विशाल यांनी गुंजाळला तेथेच थांबण्यास सांगितले.
त्यांच्यात संभाषण चालू असतानाच दुचाकीवरून आलेले संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे गुंजाळ याला दिसले. ते समोरून येताच खोलम याला मारण्यासाठीच हे आले आहेत, असे समजून गुंजाळ याने कोतकर यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी काही अंतरावर ठुबे हे गिर्हे, यांच्यासोबत बोलत होते. दोघांत कशावरून तरी वाद झाला व संतापलेल्या गुंजाळ याने कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागताच संजय कोतकर हे खाली कोसळले. कोतकर यांच्यावर गोळ्या झाडताच भीतीपोटी ठुबे हे पळून जाऊ लागले. ते पळून जात असतानाच गिर्हे याने ठुबे यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. एक गोळी लागल्यावरही ठुबे खाली पडले नाहीत. त्यामुळे गिर्हे याने दुसरी ही गोळी झाडली. त्यानंतर ठुबे हे जमिनीवर कोसळले. ठुबे यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर पाय ठेवून गिर्हे याने ठुबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या झाडल्यानंतर खाली पडलेले संजय कोतकर मयत झाल्याचे समजून गुंजाळ हा ठुबे यांच्या दिशेने आला.
तेथे आल्यानंतर गुंजाळ याने ठुबे यांच्या अंगावर धारदार शस्त्राने सपासप वार केले व कोयत्याने गळा चिरून तेथून कोतकर यांच्याकडे पाहत असताना ते मोबाईलवर बोलत असल्याचे दिसले. त्यामुळे गुंजाळ याने कोतकर यांच्याकडे धाव घेतली व त्यांच्यावर कोयत्या सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली
0 Comments