मुंबई : भारत आणि चीन या दोन देशांमधील थेट विमानसेवा अखेर पाच वर्षांनी पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) परवानगीने IndiGo आणि Air India या दोन्ही प्रमुख विमान कंपन्यांनी उड्डाणांचे नियोजन जाहीर केले आहे.
इंडिगोची झेप – दिल्ली व कोलकाताहून ग्वांगझूला थेट उड्डाणे
IndiGo ने तत्काळ पुढाकार घेत दिल्ली व कोलकाता येथून ग्वांगझू (Mainland China) या शहरासाठी दररोज थेट उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पूर्व भारतातून चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा सोयीस्कर ठरणार आहे.
एअर इंडियाचे नियोजन – दिल्ली ते शांघाय
दरम्यान, Air India ने देखील भारत-चीन उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. वर्षाअखेरीस ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, दिल्ली ते शांघाय असा थेट हवाई मार्ग सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे भारताची राजधानी व चीनची आर्थिक राजधानी शांघाय थेट जोडली जाणार आहे.
पाच वर्षांची खंडित सेवा – कारणे काय?
कोविड-१९ महामारीनंतर भारताने चीनसोबतची थेट विमानसेवा बंद केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध आणि सीमावाद यामुळे ही बंदी कायम ठेवण्यात आली. परिणामी व्यापारी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मोदी-शी जिनपिंग चर्चा निर्णायक
अलीकडेच झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर थेट हवाईसेवा पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला. याला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आर्थिक व राजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्व
भारत आणि चीन हे दोन्ही देश आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था मानले जातात. व्यापार, आयात-निर्यात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतुकीची गरज आहे. थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा कालावधी व खर्च कमी होणार आहे.
0 Comments