Hot Posts

6/recent/ticker-posts

कामगार विभागाअंतर्गत दीड लाख बांधकाम कामगारांची नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’अंतर्गत एकूण ४० दिवसांत जवळपास दीड लाख बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या ४० दिवसांच्या विशेष नोंदणी अभियानात सव्वा दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली होती.
कामगार विभागाअंतर्गत येणा-या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणा-या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आला होता. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २८ योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. पहिले विशेष नोंदणी अभियान ४० दिवस सुरू होते. दुस-या विशेष नोंदणी अभियानाचा कालावधीही ४० दिवसांचा होता.
विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ४० दिवसांत एकूण २ लाख २४ हजार ५७७ बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली होती. सहा महसुली विभागांमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली होती, तर सगळ्यात कमी कामगार नोंदणी नाशिक विभागात झाली. दुस-या टप्प्यात ४ जुलै २०१८ ते ४ ऑगस्ट २०१८ असे महिनाभर विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर १० दिवसांसाठी हे अभियान वाढविण्यात आले आणि १४ ऑगस्ट २०१८ अखेर १ लाख ४३ हजार २७४ बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली.
विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात जेथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले नव्हते अशा जिल्ह्यांमध्ये दुस-या टप्प्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष अभियान नोंदणीत सर्वांत जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात झाली, तर सर्वांत कमी नोंदणी वाशिम जिल्ह्यात झाली.

Post a Comment

0 Comments